धाराशिव: तालुक्यातील राघुचीवाडी येथील पोलिस कर्मचारी सूरज मोहन करवर-पाटील (३३) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यानेच सूरजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
सूरज करवर हे सोमवारी कर्तव्यावरून परत येताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांना बेड मिळण्यासाठी तब्बल पाच तासांची प्रतीक्षा करावी लागली. रात्री डॉक्टरांऐवजी नर्सने उपचार केले. डॉक्टर पूर्णवेळ हजर नव्हते, त्यामुळे योग्य उपचार मिळाले नाहीत, असा आरोप मृताचे वडील मोहन करवर यांनी केला आहे.
सूरज यांना बाथरूमला जाताना चक्कर आल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री व सकाळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनीही हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह राघुचीवाडी येथील सुमारे ५०० ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, घटनेची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन निवासी वैद्यकीय अधिकारी तानाजी लाकाळ यांनी दिले आहे. तर, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण कळेल, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उज्वला गवळी यांनी सांगितले.
दुसरीकडे, घटनेच्या दिवशी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार रजेवर असल्याचे निदर्शनास आले आहे.