धाराशिव जिल्ह्यातल्या जंगलांचा राजा सध्या ‘रॉकी भाई’ मोडमध्ये आहे. यवतमाळच्या टिपेश्वर जंगलातून 500 किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवमध्ये दाखल झालेला हा वाघोबा *“रिलायबल ट्रॅव्हल्स“*च्या गुप्त रूटने आल्याचा संशय आहे. त्याने धाराशिवातल्या गावकऱ्यांसमोर “माझा पॅटर्न वेगळा आहे” असा ठसका दाखवून आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे.
गेल्या महिन्यात 30 जनावरांना आपल्या टप्प्यात आणणाऱ्या या वाघाने वनविभागाचा मोठाच पेपर लीक केला आहे. पहिली ताडोबाची टीम, नंतर पुण्याची टीम, आणि आता कोण जाणे दिल्ली टीम येईल की काय! वनविभागाचे अधिकारी “वाघोबा कुठे दिसतोय?” असं विचारूनच थकलेत. तो मात्र प्रत्येक वेळी आपली सिग्नेचर स्टाईल दाखवत: “मेरे बारे मे इतना मत सोचना, दिल मे आता हूँ, समझ मे नही!”
म्हसोबाची वाडीला ‘सिंघम’ सीन
काल रात्री वाशी तालुक्यात म्हसोबाची वाडीत वाघाने दोन पाळीव जनावरांना संपवलं. शेतकरी वाघावर ओरडत पळवायला गेला, तेव्हा वाघाने त्याच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्याने शिताफीने “झपाटलेला” सिनेमाची आठवण करून दिली आणि “मैं बच गया!” म्हणत जीव वाचवला.
वनविभाग: प्लानिंग, पण नो अॅक्शन!
गेल्या 21 दिवसांत वनविभागाच्या टीमने वाघ पकडण्याचे नवनवीन प्रयोग केले. त्यांनी ड्रोन्स, ट्रॅप कॅमेरे, पिंजरे लावले, पण वाघोबाने त्यांना “चिकटायचं नाही!” असं ठरवलंय की काय अशी शंका येतेय.
स्थानिकांकडून विनंती:
“आधी वनविभागाला शोधा आणि मग वाघाला पकडा!” असं मिश्कीलपणे गावकरी म्हणत आहेत.
वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडे कितीही अत्याधुनिक साधने असली तरी, वाघोबाची स्टाईल मात्र “तुमसे ना हो पाएगा!” अशीच आहे.
अखेरीस, “टायगर अभी जिंदा है” हे ठळकपणे सांगणारा हा वाघ धाराशिवातल्या *‘मिशन इम्पॉसिबल’*ला नवीन ट्विस्ट देतोय!