अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालय नावाजलेली शाळा असूनही, विद्यार्थ्यांना वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. शाळेला स्वतःची बस नसल्याने विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करावा लागतो. मात्र, बस वेळेवर न येणे, बस भरलेल्या असणे, महिलांना अर्धे तिकीट असल्याने बस फुल असणे अशा अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
अणदूर बसस्थानकासमोर अर्धवट उड्डाणपूल असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. सोलापूरहून उमरगाकडे जाणाऱ्या बस बस्थानकात न थांबता विरुद्ध दिशेला थांबतात. त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागते.
जवाहर विद्यालय ही स्व. आलुरे गुरुजी यांनी स्थापन केलेली शाळा आहे. परंतु, शाळेला स्वतःची चांगली इमारत नाही. शाळा श्री खंडोबा देवस्थानच्या जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये भरवली जाते. ही शाळा बस स्थानकासमोरील स्वतःच्या जागेत हलविण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
याशिवाय, शाळेला स्वतःची बस उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरत आहे. गावातील इतर खासगी शाळांना स्वतःच्या बस असताना, जवाहर विद्यालयाला बस नसणे ही बाब गंभीर आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत.
Video