धाराशिव – धुळे जिल्हा परिषदेच्या अपहारकांडातील भास्कर वाघ यांना मागे टाकत, धाराशिव आणि तुळजापूर तहसील कार्यालयातील एका ‘सुपर लिपिकाने’ आपल्या करामतीने प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. या लिपिकाच्या काळ्या कारनाम्यांनी अनेकजण थक्क झाले आहेत.
“काळे” कारनामे करणारा हा लिपिक तुळजापूर तहसील कार्यालयात नियुक्त असताना धाराशिवमध्ये प्रतिनियुक्ती घेत, एकाच वेळी दोन ठिकाणी बोगस व्यवहार करताना सापडला. त्याने वर्ग २ जमिनी वर्ग १ मध्ये बदलणे, ओपन स्पेसमध्ये फेरफार करून भूखंडाच्या डील्स मारणे, आणि अम्युनिटी स्पेसमधील जागांचा गैरफायदा घेत करोडोंचा महसूल गटवला.
सोन्याच्या विटा आणि आलिशान कार: लिपिकाचा रुबाब
या लिपिकाच्या घरी सोन्याच्या विटा आहेत, हे ऐकून जनतेचे डोळे विस्फारले. एक सामान्य पोस्ट लिपिक असूनही तो आलिशान गाडीतून ऑफिसला जातो. कार्यालयात स्वतःचे कॅबिनही उभारून त्याने तहसीलदारांचा रुबाब दाखवण्याचा एकतर्फी करारच केला आहे, असे वाटते.
वरिष्ठांचा लाडका ‘सोनेरी लिपिक’
या लिपिकाच्या एका डीलमधून ३० लाख मिळाले की त्यातील १० लाख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खिशात जात होते. त्यामुळेच तो सर्वांच्या लाडक्यात गेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीनेच त्याला दोन तहसील कार्यालयांमध्ये काम करण्याची ‘सोनेरी मुभा’ मिळाली होती.
सत्य शोधणारे निलंबित, आणि खुर्चीला चिकटलेले ‘महाभाग’
या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे पुढे सरसावले होते, पण कट-कारस्थान करून त्यांनाच निलंबित करण्यात आले. आता प्रश्न असा आहे की, या लिपिकाचे आणि त्याच्या वरिष्ठांचे खुर्चीवर बसायचे दिवस अजून किती टिकणार?
‘लिपिकगिरी’चा हा ‘क्लासिक’ प्रकार
तुळजापूर आणि धाराशिव तहसील कार्यालयातल्या ‘सोनेरी लिपिकाच्या’ या कारनाम्यांवर आता प्रशासन कारवाई करणार का, की ही कहाणीदेखील एका जुन्या फाईलप्रमाणे धूळ खात पडून राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अखेरचा सवाल:
सामान्य लिपिक असे चमत्कार करू शकतो, तर तहसीलदारांनी आता काय नवीन करावे, यावर कार्यशाळा भरवायची वेळ आली आहे काय?