धाराशिव: “पार्टी विथ डिफरन्स” म्हणवणाऱ्या भाजपची शिस्त धाराशिवमध्ये वाऱ्यावर उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह एकीकडे घराणेशाही (परिवारवाद) विरोधात भाषणे ठोकतात, पण इकडे धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी “पक्षापेक्षा बायको प्यारी” असा उघड निर्णय घेत भाजप हायकमांडच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली आहे.
‘पेपर’ फोडला नाही, तर पक्षाचा विश्वास तोडला!
“मी पेपर फोडणार नाही, दोन दिवस वाट पहा,” असे गर्विष्ठ विधान करणाऱ्या राणा पाटलांनी अखेर काय केले? तर पक्षाने अधिकृतरीत्या (A फॉर्म देऊन) उमेदवारी दिलेल्या जया नाईकवाडी , तेर यांना माघार घ्यायला लावून त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा बळी घेतला. आणि हे सर्व कशासाठी? तर घरातच खुर्ची राहावी म्हणून!
भाजप हायकमांडने स्पष्ट शब्दांत “एका घरात एक पद” सांगून अर्चना पाटील यांचे तिकीट कापले होते. पण राणादादांनी “आदेश गेला चुलीत” म्हणत बायकोलाच अधिकृत उमेदवार बनवून पक्षाच्या शिस्तीच्या गालावर सणसणीत चपराक लगावली आहे.
कार्यकर्त्याला ‘सतरंजी’, बायकोला ‘खुर्ची’!
सामान्य कार्यकर्त्याने आयुष्यभर पक्षाच्या सतरंज्या उचलायच्या आणि नेत्यांनी मात्र नियम धाब्यावर बसवून घरातल्या घरात सत्तेची पदे वाटून घ्यायची, हाच का तो ‘पाटील पॅटर्न’?
जया नाईकवाडी या तेर गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांच्याकडे पक्षाचा ‘A’ फॉर्म होता. पण राणा पाटलांनी सत्तेचा वापर करून त्यांना माघार घ्यायला भाग पाडले आणि तांत्रिक खेळी करत डमी फॉर्म भरलेल्या अर्चना पाटील यांना अधिकृत उमेदवार बनवले. याला चाणक्यनीती म्हणत नाहीत, याला ‘स्वार्थी राजकारण’ म्हणतात.
फडणवीस-बावनकुळे बघ्याची भूमिका घेणार?
आता प्रश्न उपस्थित होतोय तो भाजपच्या प्रदेश नेतृत्वावर.
-
जेव्हा पक्ष सांगतोय की तिकीट नाही, तेव्हा स्थानिक आमदार बंडखोरीच्या तोडीची कृती करतो, हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना चालते का?
-
देवेंद्र फडणवीस यांच्या शिस्तीला धाराशिवमध्ये भगदाड पडले आहे का?
घराणेशाहीचा कळस
लोकसभेत अर्चना पाटील यांचा दारुण पराभव झाला. जनतेने नाकारले, तरीही हट्ट कशासाठी? केवळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची लाल दिवा गाडी दारात यावी म्हणून पक्षाची तत्वे गुंडाळून ठेवण्यात आली आहेत.
आज राणा पाटलांनी सिद्ध केले की, त्यांच्यासाठी ‘कमळ’ महत्त्वाचे नसून ‘कारभारिणी’ महत्त्वाच्या आहेत.
धाराशिवच्या जनतेने आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी आजचा हा ‘तमाशा’ उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. याचे उत्तर मतपेटीतून मिळणार की पक्षश्रेष्ठी कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.







