भारतीय जनता पार्टी ही ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, असे म्हणतात. पण धाराशिवमध्ये राणाजगजितसिंह पाटलांनी या व्याख्येचा अर्थच बदलून टाकला आहे. इथे ‘डिफरन्स’ हा आहे की, “तुम्ही दिल्लीत काहीही ठरवा, गल्लीत (आणि घरात) आमचंच चालणार!”
पंतप्रधान मोदी ‘परिवारवादा’वर प्रहार करतात, पण धाराशिवमध्ये राणादादांनी थेट “परिवार-वादा”साठी (कुटुंबाच्या हट्टासाठी) पक्षाचा ‘आदेश’ अक्षरशः खुंटीला टांगला आहे.
पेपर फुटला नाही, तर प्रश्नपत्रिकाच बदलली!
राणादादा परवा म्हणाले होते, “मी पेपर फोडणार नाही, दोन दिवस वाट पहा.”
आम्हाला वाटलं, दादा काहीतरी तत्वज्ञानाचा डोस पाजणार, कार्यकर्त्याला संधी देणार. पण कसलं काय? दादांनी पेपर फोडला नाही, तर थेट परीक्षार्थीच बदलला!
बिचाऱ्या जया नाईकवाडी! हातात पक्षाचा अधिकृत ‘A’ फॉर्म घेऊन त्या “आता आपण लढणार” अशा आविर्भावात होत्या. पण दादांनी असा काही “गनिमी कावा” (की गृह-कावा?) केला की, नाईकवाडी ताईंना अर्ज मागे घ्यावा लागला आणि डमी फॉर्म भरलेल्या अर्चना ताई ‘अधिकृत’ झाल्या.
याला म्हणतात राजकारण! बळीचा बकरा कार्यकर्त्याचा करायचा आणि मटणावर ताव मात्र नेत्यांच्या घरातल्यांनीच मारायचा!
‘शिस्त’ गेली तेल लावत!
भाजपमध्ये शिस्तीला फार महत्त्व आहे म्हणे! देवेंद्र फडणवीस डोळे वटारतात, बावनकुळे नोटीस काढतात. पण धाराशिवच्या या ‘पाटील पॅटर्न’पुढे भाजपची शिस्त “शेपूट घातलेल्या वाघासारखी” झाली आहे.
हायकमांडने सांगितले, “एका घरात एक पद, बायकोला तिकीट नाही.”
राणादादांनी मनातल्या मनात म्हटले असेल, “साहेब, राजकारण दिल्लीत करा, पण घरी जेवायला आणि राहायला मलाच जायचंय. होम-मिनिस्टर (सौ. अर्चना पाटील) नाराज झाल्या तर माझं ‘गृहखात’ अडचणीत येईल!”
त्यामुळे पक्षाची शिस्त मोडली तरी चालेल, पण घरातली ‘शांतता’ भंग होऊ नये, हाच खरा ‘प्रॅक्टिकल’ विचार दादांनी केलेला दिसतोय.
कार्यकर्त्यांचे काय?
आता प्रश्न उरतो निष्ठावंत कार्यकर्त्यांचा. त्यांनी काय करायचं?
त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या, साहेबांच्या गाडीच्या काचा पुसायच्या आणि “पाटील साहेब तुम आगे बढो” च्या घोषणा द्यायच्या.
कारण, पदं वाटताना साहेब घरात बघतात आणि कामं सांगताना खिडकीतून बाहेर बघतात.
सोशल मीडियावर जे कार्यकर्ते “आमचं दैवत” म्हणून ओरडत होते, त्यांना आता कळून चुकलं असेल की, दैवताला फक्त स्वतःच्या ‘पुजाऱ्यां’ची (कुटुंबाची) काळजी असते, भक्तांची नाही.
अखेरचा टोला
या सर्व नाट्यातून एकच धडा मिळतो:
राजकारणात ‘AB’ फॉर्म महत्त्वाचा नसतो, तर नेत्याची ‘बायको’ फॉर्ममध्ये असणं महत्त्वाचं असतं!
लोकसभेला मतदारांनी नाकारले, पक्षाने तिकीट नाकारले, तरीही ‘मागील दाराने’ (किंवा बळजबरीने) एन्ट्री मारलीच. आता निवडणूक आयोगाने चिन्ह जरी ‘कमळ’ दिले असले, तरी धाराशिवच्या जनतेला मात्र या सगळ्यात ‘वांगं’ मिळाल्याची भावना आहे.
— बोरूबहाद्दर
टीप: हा लेख केवळ राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी उपहासात्मक टिप्पणी आहे.







