तुळजापूर: तुळजापूर तालुक्यात एका डॉक्टरने रुग्णावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. रमेश राजेंद्र लबडे असे आरोपी डॉक्टरचे नाव असून तो ओम साई क्लिनिकमध्ये काम करतो. पीडित महिला ही २२ वर्षीय असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सर्दी आणि खोकल्याच्या उपचारासाठी लबडे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती.
यावेळी डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत असतानाच डॉक्टरने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या कृत्याचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर आरोपी डॉक्टर पीडितेला पुष्पविहार लॉजमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या पीडित महिलेने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने पालकांसह तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी डॉ. रमेश राजेंद्र लबडे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम-64(2),351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भालेराव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे तुळजापूर परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉ. रमेश राजेंद्र लबडे हे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी सांगितले.
गुन्ह्याची माहिती:
- गुन्हा दाखल क्रमांक: ५१२/२०२४
- गुन्हा दाखल तारीख: ०१/११/२०२४
- गुन्हा दाखल वेळ: १३.२९ वाजता
- गुन्ह्याचे ठिकाण: ओम साई क्लिनिक, मोजे मंगरुळ आणि पुष्पविहार लॉज, तुळजापूर
- गुन्ह्याचा प्रकार: बलात्कार, ब्लॅकमेलिंग, धमकी
- तक्रारदार: २२ वर्षीय महिला (नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही)
- आरोपी: डॉ. रमेश राजेंद्र लबडे