धाराशिव – सरकारने आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील राखीव जागांसंदर्भात चुकीचा आदेश काढल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारला शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवण्याचे आवाहन केले होते, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलेल्या या इशाऱ्यानंतर, शिवसेना पक्षाच्या पाठपुराव्यामुळे आंदोलनाला यश मिळाले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख तथा नगरपालिकेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी दिली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास (दादा) पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उलटी प्रतिमा टांगून आंदोलन करण्यात आले होते.
गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा व 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी आणि राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा थांबावावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले होते.
या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या याचिकेविरोधात अपील दाखल करण्यात आले होते. चौकशी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आंदोलनामुळे राज्यातील अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याचे सोमनाथ गुरव यांनी सांगितले.