धाराशिव – तालुक्यातील समुद्रवाणी गावातील श्रद्धास्थान असलेले भैरोबाचे मंदिर आता मटक्याच्या अवैध धंद्याचे केंद्र बनले आहे. “धाराशिव लाइव्ह” ने उघडकीस आणलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, मंदिराच्या पवित्र परिसरात एक मटका एजंट बेधडकपणे मटका घेताना दिसत आहे. या घटनेमुळे मंदिराच्या पावित्र्याला आणि धार्मिक भावनांना गंभीर धक्का बसला आहे.
गोरगरीब जनतेची होणार आर्थिक लूट, पोलीस मूग गिळून गप्प
या मटका अड्ड्यामुळे स्थानिक गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडत आहे. अनेक कुटुंबांचे कष्टाचे पैसे या अवैध धंद्यात बुडत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, बेंबळी पोलीस स्टेशनचे पोलीस या मटका एजंटकडून हप्ता घेऊन चिडीचूप बसले आहेत.
भैरोबा मंदिरातील ही घटना धार्मिक स्थळांचे होणारे व्यावसायीकरण आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधते. मंदिर परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, पोलिसांच्या कथित हलगर्जीपणामुळे सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.
मंदिर परिसरात सुरू असलेला मटका अड्डा बंद करून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित सहभागाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही मागणी जोर धरत आहे.