धाराशिव : चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील एका तरुणाला वाढदिवसाच्या निमित्ताने बाहेर नेऊन त्याच्यावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपातून जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षातर्फे सर्व साक्षीदार आपल्या जवाबावर ठाम असूनही, बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे हा निकाल लागला.
नेमकी घटना काय होती?
फिर्यादी वामन भीमराव गरड (रा. चिकुंद्रा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ जून २०१९ रोजी आरोपी चंद्रकांत गायकवाड, भाग्यवान गायकवाड आणि दीपक लोंढे यांनी त्यांना चंद्रकांतच्या वाढदिवसाचे कारण सांगून गाडीतून सोलापूर जिल्ह्यातील नान्नज गावाजवळ नेले होते. तिथे रात्री १० च्या सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या पोटात चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३६७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद:
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले आणि विशेष म्हणजे एकही साक्षीदार फितूर झाला नाही. तरीही आरोपींचे वकील ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी साक्षीदारांच्या उलटतपासात महत्त्वाचे मुद्दे मांडले:
-
वाढदिवसाचा बनाव: ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी आरोपी चंद्रकांत गायकवाड याचा वाढदिवस नसल्याचे बचाव पक्षाने सिद्ध केले.
-
पूर्ववैमनस्यातून गोवले: फिर्यादीच्या वडिलांनी पूर्वी आरोपी क्र. १ च्या नातेवाईकाचा खून केला होता. त्या रागातून ही खोटी केस दाखल केल्याचा बचाव ॲड. साखरे यांनी घेतला.
-
जबाबातील तफावत: फिर्यादीने पोलिसांसमोर दिलेला जबाब, न्यायालयातील जबाब आणि कलम १६४ खालील जबाब यात परस्परविरोधी माहिती असल्याचे निदर्शनास आणून दिले.
-
तपासातील त्रुटी: जखमी फिर्यादीने ज्या पोलीस पाटलांना माहिती दिली, त्या पोलीस पाटलांचा जबाब पोलिसांनी तब्बल दीड महिन्याने नोंदवला, ज्यामुळे संशय निर्माण झाला.
-
फॉरेन्सिक पुराव्यावर आक्षेप: डॉक्टरांनी सादर केलेल्या हत्याराच्या अहवालात आणि फॉरेन्सिक पुराव्यात त्रुटी असल्याचे व पोलिसांनी पुराव्यात छेडछाड केल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायालयाचा निकाल:
ॲड. विशाल साखरे यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दाखले देत मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायालयाने तिन्ही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. संकेत गोरे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अमित गोळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, महेश पवार आणि पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.




