कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे पोलिसांनी थरारक कारवाई करत उसाच्या फडामध्ये लपवून ठेवलेले अफूचे पीक उद्ध्वस्त केले. तब्बल २७ लाख ७८ हजार रुपयांचे अफूचे झाडे जप्त करत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिराढोण पोलिसांनी ही गुप्त कारवाई यशस्वी केली.
उसामागे अफूचा काळाबाजार!
संभाजी उर्फ बंडू भीमराव हिलकुटे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील गट नंबर ११९ व १२१ मध्ये उसाच्या आड अफूची लागवड केली होती. कायद्याला धाब्यावर बसवत एनडीपीएस कायद्यातील नियम डावलून चोरटी विक्रीसाठी हा साठा वाढवला जात होता. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा डाव उधळला गेला.
पोलीसांनी टाकला छापा, आरोपीला अटक!
शिराढोण पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी आरोपीविरोधात कलम १५ व १८ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अप्पर अधीक्षक गौहर हसन आणि उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कारवाईत कोण होते सहभागी?
या कारवाईत कळंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप, पोलीस उपनिरीक्षक तांबडे, बीट जमादार राजुदास राठोड आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.