धाराशिव – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठ दिवस उलटले तरी महायुतीकडून सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता असून भाजपने काही मंत्र्यांच्या नावांवर आक्षेप घेतल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातील समावेश अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला आहे.
तानाजी सावंत हे राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. अँब्युलन्स खरेदी घोटाळा, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती यांसारख्या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत सावंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे भाजपकडून सावंत यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्नियुक्तीवर आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंत यांच्या बाजूने ठाम असल्याचे समजते. शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या आमदार आणि खासदारांना नाराज होऊ दिलेले नाही. मात्र, भाजपच्या या भूमिकेमुळे सावंत यांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपकडून सावंत यांच्यासह अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकर यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला विरोध होत असल्याने शिंदे गटातील नाराजी वाढू शकते. महायुतीतील अंतर्गत तणाव कसा हाताळला जातो आणि सावंत यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप आणि शिंदे गट यांच्यातील चर्चेनंतरच सावंत यांचे राजकीय भवितव्य स्पष्ट होईल, पण सध्या तरी त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणे कठीण वाटत आहे.