धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा हे फटाक्यांचे शिवकाशी! येथे दरवर्षी लाखो फटाके तयार होतात, पण त्यांच्या जळण्यापेक्षा मोठा स्फोट इथे भ्रष्टाचाराचा झाला आहे.
२९ जानेवारीला ‘बाबा फायर वर्क्स’ या कारखान्यात स्फोट झाला आणि ९ कामगार जखमी झाले. प्रशासनाने तत्परतेने पंचनामा केला, पण अहवालात जे वाचायला मिळालं, ते अगदी स्फोटकच ठरलं!
आग लागली की लावली गेली?
अहवालानुसार, शेजारच्या बांधावरच्या वाळलेल्या गवताने पेट घेतला आणि आग कारखान्यापर्यंत पोहोचली! पण इथेच प्रश्नांची माळ उभी राहते—
- कामगार जेवण करत होते, त्यांना आगीचा वास कसा आला नाही?
- स्फोटाआधी आग अन्य ठिकाणी लागली होती, तर कुठलीही बचावयंत्रणा नव्हती का?
- सुतळी बॉम्ब उन्हात वाळवत होते, पण तिथे सुरक्षा यंत्रणा होती का?
- फटाका परवानग्या वाटताना कुठले नियम पाळले गेले होते?
परवाने ‘धडाधड’ आणि चौकशी ‘झोपा काढ’!
सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी थेट आरोप केले की निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी नियमबाह्य पद्धतीने पैसे घेऊन फटाका परवानग्या दिल्या! २८ नोव्हेंबर रोजी त्यांनी तक्रार केली, पण ३० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे मसुरीची थंड हवा खात परत आले आणि प्रकरण फाईलच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं.
विषय वळवायचा वन विभागावर?
स्फोटाच्या प्रकरणात चुकीच्या परवानग्या, सुरक्षा उपायांची वानवा याचा कसलाही उल्लेख नाही. उलट, जिल्हाधिकारी अहवालात आग गवताने लागल्याचं सांगतात. म्हणजे, भ्रष्टाचाराचा स्फोट झाकण्यासाठी आग ‘वन विभागावर’ ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय का?
एसआयटी गठीत करा, कारखान्यांची चौकशी करा!
या संपूर्ण प्रकारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आहे. त्यामुळे—
- सर्व परवानग्यांची SIT मार्फत चौकशी व्हावी.
- त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करावा.
- प्रत्येक फटाका कारखान्याच्या परवानग्यांची पोलिस विभागामार्फत चौकशी करावी.
तेरखेडा स्फोट हा फक्त फटाक्यांचा नव्हता, तो भ्रष्टाचाराच्या वाळूत दडलेल्या असुरक्षिततेचा होता. आता प्रश्न एकच—आग नक्की कशाने लागली, आणि कोणकोण जळणार?