नळदुर्ग: ट्रकचालक आणि त्याच्या भाच्याला मारहाण करून त्यांच्याकडून तब्बल 60 लाख 11 हजार रुपयांचा माल लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरील गंधोरा पाटीजवळ घडली.
देवेंद्र रेवण्णप्पा शेडुळे (वय 40 वर्षे, रा. दुबलगुंडी, ता. हुमनाबाद, जि. बीदर) हे त्यांचा भाच्चा संजू हनुमंत एकलुरे यांच्यासह ट्रक क्रमांक के.ए. 56-4380 ने हैद्राबादहून 24 टन 770 किलो वजनाचे कॉपरचे रॉड घेऊन शिलवासा येथे जात होते.
दरम्यान, गंधोरा पाटीजवळ काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यांना गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. त्यानंतर ‘आम्ही फायनान्स कंपनीचे कर्मचारी आहोत, तुमचे ट्रकचे हप्ते थकीत आहेत,’ असे सांगून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून कारमध्ये बसवले आणि ट्रक, तीन मोबाईल फोन आणि ट्रकमधील कॉपरचे रॉड असा एकूण 60 लाख 11 हजार रुपयांचा माल लुटून नेला.
याप्रकरणी देवेंद्र शेडुळे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम 310(2), 126(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लुटारूंचा शोध सुरू केला आहे.