नळदुर्ग : दुबलगुंडी (ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) येथील ट्रकचालकाची फसवणूक करून त्याच्याकडून ट्रक, कॉपरचा माल असा २ कोटींहून अधिक किमतीचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला नळदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे.
देवेंद्र रेवणप्पा शेडुळे (वय ४०) हे हैद्राबाद ते शिलवासा असा प्रवास करत असताना १७ डिसेंबर रोजी नळदुर्गजवळ पाच अनोळखी इसमांनी त्यांचा ट्रक थांबवला. त्यांनी स्वतःला फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून ट्रकचे दोन हप्ते थकीत असल्याचे सांगितले. शेडुळे यांनी ट्रक थांबवल्यावर त्यांना आणि त्यांच्या भाच्याला मारहाण करून कारमध्ये बसवले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून ट्रक (क्र. एपी ५६-४३८०), त्यातील २४ टन ७७० किलो वजनाचा कॉपरचा रॉड आणि तीन मोबाईल फोन लुटून नेले.
शेडुळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामाला सुरुवात केली. गुन्ह्याच्या कार्यपद्धतीचा आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १८ डिसेंबर रोजी उमरगा येथून इरफान जाकीर शेख (वय २७) या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून लुटलेला ट्रक आणि कॉपरचा माल असा एकूण २,२१,३१,८७१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या कारवाईत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सरोदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद कांगुणे, पोउपनि संतोष गिते, पोकॉ अविनाश दांडेकर, बालाजी शिंदे, सुर्यकांत फुलसुंदर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हावलदार शौकत पठाण, फराहाण पठाण, जावेद काझी, विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निबांळकर, पोलीस नाईक बबन जाधवर, नितीन जाधवर, पोकॉ योगेश कोळी, चालक हावलदार विजय घुगे, पोकॉ शिंदे आदींचा समावेश होता.