तुळजापूर: कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, मंदिर समितीने स्वनिधीतून ६० कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून त्याअंतर्गत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.
या जीर्णोद्धार कामांबाबत पुजारी वर्ग आणि भाविकांच्या सूचना घेण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली मंदिराच्या सभामंडपाचा काही भाग पुन्हा बांधण्यात येणार आहे. मंदिर परिसर मोकळा करण्यासाठी मंदिरातील ओवऱ्या थोड्या मागे घेतल्या जातील. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून भाविक, पुजारी आणि व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
दर्शनार्थींना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन जीर्णोद्धार कामाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांसाठी लिफ्ट आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मंदिरात नव्याने केलेले बांधकाम काढून भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभामंडप आणि भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरुस्ती केली जाणार आहे. गोमुखतीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळतीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार, खंडोबा मंदिर, यमाई मंदिर यांच्या जतन आणि दुरुस्तीचे कामही केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्राचे जतन आणि दुरुस्तीचे काम नियोजित आहे.
जीर्णोद्धार कामांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुरुवारी नागरिक, पुजारी आणि भाविकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वांच्या सूचनांवर चर्चा करून कामाचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.