तुळजापूर: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मंदिर प्रशासनाकडून एक प्रकारे लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “दानपेटीत चुकून पडलेली कोणतीही मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही, ती वस्तू दान समजली जाईल,” असा अजब ठराव मंदिर संस्थानने मंजूर केला असून, याचा मोठा फटका पिंपरी-चिंचवडमधील एका भाविकाला बसला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड येथील एक भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी पैसे अर्पण करताना त्यांच्या हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली. आपली चूक लक्षात येताच या भाविकाने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला.
सदर भाविकाने अंगठीचा फोटो आणि ती नेमकी कोणत्या दानपेटीत पडली, याची अचूक माहिती प्रशासनाला दिली. सत्यता पडताळून आपली वस्तू परत मिळावी, यासाठी त्यांनी रीतसर अर्जही केला. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही मंदिर प्रशासनाने त्यांना अंगठी परत करण्यास नकार दिला आहे.
मंदिराचा अजब न्याय!
भाविकाने विनंती करूनही मंदिर संस्थानने त्यांचा अर्ज निकाली काढला आहे. संस्थानच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ठरावात स्पष्ट नमूद आहे की, दानपेटीत एकदा पडलेली वस्तू (चुकून का असेना) ती देवास अर्पण झाली असे मानले जाईल आणि ती परत दिली जाणार नाही.
मात्र, देवीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भक्तांची अशा प्रकारे अडवणूक करणे आणि चुकून पडलेल्या वस्तूंवर हक्क सांगणे म्हणजे भाविकांची लूटच असल्याची भावना व्यक्त होत आहे. तुळजाभवानी देवीच्या दरबारातील या ‘अजब कारभारा’वर आता भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.






