तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील मतभेद उघडकीस येत आहेत.महाविकास आघाडीने तुळजापूरची जागा काँग्रेसला देऊन ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षाच्या या निर्णयाला धुडकावले आहे. पक्षाचे नेते जीवनराव गोरे यांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला आहे तर संजय निंबाळकर आणि अशोक जगदाळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी अधिकृतरित्या अर्ज दाखल करत, महाविकास आघाडीच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, गोरे यांनी स्वतःच्या इच्छेनुसार उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संजय निंबाळकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरून स्वतःला विरोधात उभे केले आहे. काही दिवसांपूर्वीच निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षाची टीका केली होती. आता अर्ज भरून त्यांनी पक्षाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे संकेत दिले आहेत.
संजय निंबाळकर पाठोपाठ गेली दोन महिने भाऊ लढणार, बदल घडणार म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
संजय निंबाळकर यांच्या अर्ज दाखलप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकरही उपस्थित होते, ज्यामुळे पक्षांतर्गत मतभेद अधिकच ठळक झाले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), आणि काँग्रेस हे पक्ष सामील आहेत. मात्र, या तिन्ही पक्षांच्या समन्वयामुळे काँग्रेसला तुळजापूरची जागा देण्यात आली होती, आणि या मतदारसंघातून ऍड. धीरज पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत ढगफुटी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.. महाविकास आघाडीत आलेली फूट तुळजापूर मतदारसंघातील निवडणुकीवर कोणता परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, आणि तुळजापूर मतदारसंघातून एकूण ५५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आजवर एकूण ८७ अर्जांची नोंद झाली आहे. उद्या या अर्जांची छाननी होणार असून, कोणाचे अर्ज वैध ठरणार आणि अंतिम उमेदवारी यादी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.