तुळजापूर : गेल्या अनेक वर्षांपासून शहर एन्ट्रीच्या नावाखाली वाहन चालकांना लुटणाऱ्या ठेकेदारांचा अखेर ‘ठेका’ संपला! नगरपरिषदेच्या अधिकृत वाहनतळ ठेक्याचा कालावधी ८ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर, यंदा नगरपरिषदेकडून कोणतीही लूटसत्र राबवले गेले नाही. मात्र, काही महाठकांनी संधी साधत बनावट पावत्या छापून भाविक आणि वाहनचालकांची राञीच्या अंधारात लूट केली.
शनिवारी (दि. ९) मध्यरात्री घाटशिळ वाहनतळ परिसरात ही बनावट पावत्यांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. काही अज्ञात व्यक्तींनी नगरपरिषदेचा ठेका संपल्याचा गैरफायदा घेत भाविकांना लुबाडण्याचा प्रकार केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
बनावट पावत्यांची रात्रभर उधळण!
नगरपरिषदेकडून अधिकृतपणे वाहनतळाचे व्यवस्थापन सुरू होण्याआधीच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घाटशिळ परिसरात डुप्लिकेट पावत्या फाडण्यास सुरुवात केली. या लुटीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गर्दीच्या नियोजनाचा अभाव – वाहतूक कोंडीचा हैदोस!
रविवारी मोठ्या संख्येने भाविकांच्या वाहनांनी शहरात प्रवेश केला. यातील ८०% वाहने घाटशिळ वाहनतळावर जमा झाली. परिणामी, वाहनतळ भरताच प्रवेश बंद करण्यात आला. त्याचा फटका संपूर्ण शहराला बसला. भवानी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, घाटशिळ परिसरात वाहतूक कोंडीमुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
पोलिस आणि प्रशासनाने शुक्रवार पेठ, हाडको, पाणी टाकी, उदयवराव पाटील सभागृह येथे वाहने वळवण्याचे नियोजन केले असते, तर ही परिस्थिती टाळता आली असती. पण नियोजनाच्या अभावामुळे सर्वच वाहने घाटशिळ वाहनतळाकडे वळली आणि शहराला गोंधळाचा तडाखा बसला.
ठेकेदार गेला, लूट संपली, पण गोंधळ कायम!
पूर्वीचा ठेकेदार शहर एन्ट्रीच्या नावाखाली उघडपणे भाविकांना लुटायचा. मात्र, यंदा नगरपरिषदेने स्वतः व्यवस्था हाती घेतल्याने ती आर्थिक लूट थांबली. पण योग्य नियोजनाअभावी वाहतूक व्यवस्थापनाचा फज्जा उडाला. भविष्यात अशा प्रकारची कोंडी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला ठोस नियोजन करावे लागणार आहे.
Video