तुळजापूरमध्ये गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (रा. सराटी) याला अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे.
अटक आरोपींची यादी:
- संगीता गोळे (मुंबई)
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
- संतोष खोत (मुंबई)
- विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (रा. सराटी)
मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत राज्यातील पोलिसांना मोठा इशारा दिला आहे.
“ड्रग्जच्या प्रकरणात कोणीही पोलीस अधिकारी सहभागी आढळल्यास त्याला थेट बडतर्फ केले जाईल, कोणतेही निलंबन नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या आदेशानंतर तुळजापूर पोलिसांनी आपली मोहीम आणखी तीव्र केली आहे.
‘बडे मासे’ अजूनही पोलिसांच्या तावडीत नाहीत!
पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असली तरी, हे फक्त ‘छोटे मासे’ आहेत. मुख्य सूत्रधार आणि मोठे मासे अद्याप मोकाट फिरत आहेत.
तुळजापुरातील काही बडे राजकीय कार्यकर्ते देखील या ड्रग्जच्या धंद्यात गुंतले होते, आणि एका प्रमुख राजकीय नेत्याच्या ‘छत्रछायेखाली’ ते मोकाट फिरत होते.
गॅंगचा ‘पाळणीकर्ता’ कोण?
तुळजापूरात ड्रग्जच्या ‘गॅंग’चा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचे उघड झाले आहे. पण या गॅंगना ‘दाणे’ टाकणारे ‘बडे मासे’ कोण आहेत?
- राजकीय वरदहस्त असलेले हे ‘बडे मासे’ कधी गळाला लागणार?
- पोलिसांनी आता पुढचा निशाणा कोणावर साधला आहे?
तुळजापूरात सध्या या प्रश्नांची चर्चा रंगली आहे. पोलीस ‘बड्या मास्यांवर’ कधी कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.