तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवादरम्यान तुळजापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन तरुणांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर नगरपरिषद वाहनतळासमोर दोन गटांत जोरदार हाणामारी होऊन थेट हवेत गोळीबार करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हा गोळीबार झाल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
नेमके काय घडले?
नवरात्रोत्सवामुळे शहरात लाखो भाविकांची गर्दी उसळलेली असताना मंगळवारी मध्यरात्री २ वाजता नगरपरिषदेच्या पार्किंग परिसरात दोन गटांमध्ये अचानक वाद पेटला. या वादाचे रूपांतर पाहता पाहता तुंबळ हाणामारीत झाले आणि त्या दरम्यान थेट बंदुकीतून हवेत गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून तुळजापूर पोलीस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. खाकीचा धाक उरला नसल्याचेच या थरारावरून अधोरेखित झाले आहे.
वर्षाभरात गोळीबाराची चौथी घटना
तुळजापूर शहरात हवेत गोळीबार होण्याची मागील एका वर्षातील ही तब्बल चौथी घटना आहे. परवाच किरकोळ वादातून दोन तरुणांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत दोघांचाही मृत्यू झाला होता. हे दुहेरी हत्याकांड ताजे असतानाच पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने तुळजापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या निष्क्रिय कारभारामुळे तुळजापूर शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे आणि टोळीयुद्ध बेफाम वाढल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. इतक्या गंभीर घटनांची मालिका सुरू असताना आणि गुन्हेगारांचे मनोबल वाढलेले असतानाही वादग्रस्त पोलीस निरीक्षकांची अद्याप बदली का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल तुळजापूरकर विचारत आहेत.
नवरात्रोत्सवाच्या संवेदनशील काळात लागोपाठ घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे.





