तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या कोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात येत आहेत. “आई राजा उदो!” असा जयघोष करत देवीच्या चरणी दर्शनासाठी आलेल्या या भाविकांच्या गर्दीत पोलिसांचं एक वेगळंच काम सुरू आहे – त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचं टेंडर!
दररोज जवळपास पाच लाख भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत, त्यामुळे भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साधारणत: बाराशे ते दीड हजार पोलीस देवीच्या सेवेत म्हणजेच बंदोबस्तासाठी तैनात आहेत. परंतु, देवीच्या दर्शनाबरोबरच, पोलिसांसाठी चहा, नाश्ता आणि दोन वेळचं जेवण सुद्धा आवश्यकच आहे.
यंदा याच भोजन पुरवठ्याच्या टेंडरवरून तगडा मजेशीर घटनाक्रम घडला. गतवर्षी हे टेंडर धाराशिवच्या हॉटेलचा बिझनेस करणाऱ्या एका महिलेला मिळालं होतं. तिचं बिल अजूनही शासन दरबारातच अडकून पडलेलं असल्यामुळे ती या टेंडरपासून थोडी दूर राहायचं ठरवलं. “हिशोबाचा खर्च अजूनही मिळाला नाही, मग यंदा आम्ही काम का करावं?” असा तिचा सवाल आहे. यातच सोलापूरच्या एका हुशार व्यक्तीकडे यंदाचं टेंडर आलं आहे, म्हणजे तुळजापुरात नवरात्रीच्या महोत्सवात पोलिसांच्या पोटभर जेवणाची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे! फक्त नाव सोलापूरच्या व्यक्तीचं आहे, पण काम मात्र काही पोलीस करीत आहेत..मागील वर्षीही पोलिसांनी टेंडर एकाच्या नावावर, काम दुसराच करतो आणि बिल तिसराच उचलतोय, असं केलं होतं. पोलिसांनी यावर्षी स्थानिक व्यापाऱ्याकडून फुकटचा किराणा गोळा केला आहे.
जेवणासाठी लागणारा तेल, तूप , रवा, पोहे ,साखर, पीठ, तिखट, मीठ यांचा साठा स्थानिक व्यापाऱ्यांकडून गोळा करण्यात आला आहे.व्यापाऱ्यानी देखील धंदा करताना पोलीस आडवे येऊ नये म्हणून गुमान मागेल तेवढं दिलं. व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की देवीच्या कृपेने या वर्षी खाण्याच्या गोष्टींचीही भरपूर मागणी असणार आहे. परंतु, पोलिसांनी इथे थांबून राहिलं नाही. त्यांनी पालकमंत्री साहेबांकडूनही खास मेजवानी मिळवली आहे! आता हे समजल्यावर तुळजापुरातील भाविकांचा असा सवाल आहे की, “हे देवीच्या बंदोबस्तासाठी आलेत की खास पार्टी साठी?”
पण खरी गंमत तिथं आहे. गतवर्षीच्या १६ लाख रुपयांच्या अनुदानातं हिशोब अजूनही काही मोजून निघाला नाही. हे पैसे कुठे गेले, असा प्रश्न आजही उभा आहे. आणि यंदा नव्या टेंडरचं अनुदान कुणाच्या खिशात जाणार, याचा अंदाज लावायला जनतेला साधारणत: एकच प्रश्न पडला आहे – हे पैसे कुठल्या चाळवलेल्या हिशोबातून गायब होणार?
तुळजापूरच्या भाविकांसाठी तर देवीचं दर्शन ही जीवनातील परमानंदाची गोष्ट आहे. परंतु, देवीच्या कृपेने पोलिसांना सुद्धा एक आनंददायी मेजवानी मिळतेय हे पाहून त्यांच्या मनातही एक नवीन प्रकारचा आनंद निर्माण झालाय. यंदा यात्रेतील अनुदान कुणाच्या खिशात जाणार, ह्याचं उत्तर मात्र देवीच देतील, असं वाटतं!
म्हणजेच, देवीच्या महोत्सवात भाविकांचं दार्शनिक समाधान होत असलं, तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पोट पण सुखावलंय हे नक्की!