तुळजापूर: रेशनकार्डशिवाय गहू आणि तांदूळ देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने रेशन दुकानात राडा घालत शिवीगाळ केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील शिराढोण येथे घडली आहे. संतापाच्या भरात त्याने रेशन वाटपाचे मशीन जमिनीवर आदळून फोडले, तसेच महिलेच्या अंगावर मशीन फेकून मारत जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराढोण (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे उमाबाई अंकुश माने (वय ३०) व त्यांचे पती अंकुश माने हे रेशन दुकान चालवतात. मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्याच गावातील आरोपी विजय राजेंद्र गंभीरे हा रेशन दुकानात आला. त्याने रेशनकार्ड सोबत न आणताच गहू आणि तांदळाची मागणी केली.
यावेळी फिर्यादी उमाबाई यांचे पती अंकुश माने यांनी नियमानुसार ‘रेशन कार्डशिवाय धान्य देता येत नाही’ असे त्याला स्पष्टपणे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी विजय गंभीरे याने माने दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने रेशन दुकानातील ई-पॉस मशीन (किंमत अंदाजे २५,००० रुपये) उचलून जमिनीवर जोरात आदळले व फोडून टाकले. एवढ्यावरच न थांबता त्याने सदर मशीन फिर्यादी उमाबाई माने यांच्या अंगावर फेकून मारले, ज्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे वर्तन त्याने केले.
या धक्कादायक प्रकारानंतर उमाबाई माने यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी शुक्रवारी (दि. १ मे) दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) आरोपी विजय राजेंद्र गंभीरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (४) आणि १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






