तुळजापूर तहसील कार्यालयात थंडगार वाऱ्याच्या चाहुलीने साऱ्या कर्मचाऱ्यांची उत्सुकता ताणली होती. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी आपल्या केबिनमध्ये निसर्गाच्या नियमांना धक्का देत ‘स्वतःचे हवेचे राज्य’ निर्माण केले होते. एसीच्या गारव्यामुळे बाहेर उन्हाने होरपळणारे लोक तहसील कार्यालयात शिरताच ‘स्वर्गसुख’ अनुभवायला लागत होते, पण ही चैन फार काळ टिकली नाही!
गुपित कसं फुटलं?
सुरुवातीला तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याला ‘तहसीलदारसाहेबांचे गार आत्मविश्वासाचे प्रतीक’ मानले. पण प्रश्न पडू लागले—हा एसी आला कुठून? सरकारी नियमांच्या उन्हात तो कसा तग धरून राहिला? खर्चाच्या बिलांचे कागद शोधू लागले, तेव्हा उघडकीस आले की हा एसी एका टक्केवारी प्रेमी कंत्राटदाराने ‘प्रेमाची आठवण’ म्हणून दिला होता. मात्र, विजेचे बिल मात्र सरकारच्या तिजोरीतून जात होते!
धाराशिव लाइव्हची बातमी आणि ‘हवामान बदल’
धाराशिव लाइव्हने यावर प्रकाश टाकताच तहसीलदारांच्या केबिनमध्ये ‘हवामान बदल’ झाला! काही क्षणांपूर्वीपर्यंत जो एसी गारवा पसरवत होता, तो अचानक गायब झाला. आता तहसीलदारांच्या केबिनमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे, आणि सरकारी चौकशीची गरम हवा सगळीकडे फिरू लागली आहे.
‘थंड’ व्यवहाराचा ‘गरम’ शेवट
या घटनेनंतर तहसील कार्यालयात चर्चा रंगली—”तहसीलदारांचा गारवा जरा जास्तच वाढला होता, त्यामुळेच ‘लोकशाहीच्या उन्हाने’ तो वितळायला वेळ लागला नाही!” आता सर्वसामान्य नागरिकांना एकच प्रश्न पडला आहे—”आमच्या न्यायाच्या फाईलींनाही एखादा एसी मिळेल का?”
गारव्याने शुगर कंट्रोल, पण आता?
माहिती आहे का? तहसीलदार साहेबांना शुगर आहे आणि त्यांना गारव्यामुळे ती नियंत्रणात ठेवता येत होती! थंड हवेमुळे त्यांचा रक्तदाब आणि साखर नियंत्रणात राहत होती, पण आता एसी गायब झाल्याने ते ‘घामाघूम’ होत आहेत. गारव्यात जी ‘थंड शांतता’ होती, ती आता उन्हाच्या तापट झळांनी विस्कटली आहे.