तुळजापूर: तालुक्यातील वडगाव (लाख) परिसरात पवनचक्कीच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन आणि वनसंपदेची हानी होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. या संदर्भात रिन्यु पॉवर पवनचक्की कंपनीच्या कामाच्या कायदेशीरतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पवनचक्की प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उचलण्यात आले असून, त्याची रॉयल्टी शासकीय तिजोरीत भरली आहे का, याबाबत साशंकता आहे. तसेच, संबंधित उत्खनन कायदेशीर की बेकायदेशीर, याची चौकशी होणे आवश्यक आहे. याशिवाय, पवनचक्कीला रस्ता करण्यासाठी वृक्षतोड करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी वन विभागाची परवानगी घेतली होती का, की बेकायदा वृक्षतोड करण्यात आली, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
बेकायदेशीर गौण खनिज पुरवठा? – गुन्हे दाखल करण्याची मागणी
वडगाव (लाख) परिसरातील पवनचक्कीच्या कामासाठी नजीकच्या एका खाणीमधून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज पुरवले जात आहे. मात्र, संबंधित पुरवठादाराकडे याबाबतचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित खाणमालक आणि रिन्यु पॉवर कंपनीवर गुन्हे दाखल करून वसुली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
गौण खनिज उत्खनन आणि रॉयल्टी चौकशीची मागणी
तुळजापूर तालुक्यात अनेक पवनचक्की कंपन्यांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू असून, त्याच्या रॉयल्टीबाबत महसूल विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच, बेकायदेशीर वृक्षतोड आणि गौण खनिज उत्खनन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.