तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे एका क्रूर घटनेने खळबळ उडाली आहे. मुलगा होत नाही या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धनंजय भारत माळी याने आपली पत्नी गोजर धनंजय माळी (वय २८ वर्षे) हिचा १९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेचार वाजता कोयत्याने वार करून खून केला. आरोपीने प्रथम पत्नीला शिवीगाळ केली, त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि शेवटी गळा दाबून कोयत्याने गळ्यावर वार करून तिचा जीव घेतला.
मयत महिलेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला मुलगा न झाल्याने तो नेहमीच पत्नीला त्रास देत असे. याच कारणावरून त्याने हे क्रूर कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.