उमरगा – तालुक्यातील डिग्गी येथे राहणाऱ्या विठ्ठल गणपती सुर्यवंशी यांनी आपल्या शेतातील उसाला कुंपन करून बायडिंगच्या तारेतून विद्युतप्रवाह सोडल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुर्यवंशी यांनी विजेचा झटका देऊन दोन म्हशींना ठार केल्याचा आरोप आहे. मृत पावलेल्या म्हशी संजु उद्धवराव पाटील (रा. गदलेगाव ता.बस्वकल्याण ) आणि त्यांचे पुतणे देविदास पाटील यांच्या मालकीच्या होत्या. म्हशींची अंदाजे किंमत 1,50,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच संजु पाटील हे सुर्यवंशी यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर पाटील यांनी दि. 29 जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सुर्यवंशी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 325 (जाणूनबुजून दुखापत करणे) आणि 352 (शिवीगाळ करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.