धाराशिव – धाराशिव येथे दोन तरुणांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे जबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता तेरणा कॉलेज जवळील वसीम मच्छी सेंटर येथे घडली.
मंगेश गजानन मोरे (वय २२, रा. बॅककॉलनी आदिवासी मुलांचे वस्तीगृह, मूळ रा. उमरधरवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) आणि त्यांचा मित्र व भाऊ गणेश मोरे हे जेवण करण्यासाठी वसीम मच्छी सेंटरमध्ये गेले असताना आयान अली अहमद अली कुरेशी, आजिम सलीम शेख आणि ईम्रान आयुब पठाण (तिघेही रा. शालिमार कॉलनी, धाराशिव) या तिघांनी त्यांना धक्का का दिला, असे विचारत लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली.
मारहाणीदरम्यान मंगेश मोरे यांच्या पॅन्टच्या खिशातील २००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मंगेश यांच्या मित्रालाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी मंगेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०९(४), ३५२, ३५१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.