उमरगा: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १८) रात्री लातूर-कलबुर्गी मार्गावरील एकुरगा श्रीलक्ष्मी पाटीजवळ घडली. प्रमोद भानुदास कराळे (४२) व प्रणिती कराळे (३८, दोघे रा. तुरोरी) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे तुरोरी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद कराळे हे पत्नी प्रणितीसोबत आपल्या दुचाकी (क्र. एमएच २५ एएन ७०७५) वरून लातूरला गेले होते. लातूरहून उमरगा मार्गे तुरोरीला परतत असताना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास एकुरगा श्रीलक्ष्मी पाटीजवळ ऊसाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ही धडक इतकी भीषण होती की प्रमोद कराळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रणिती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
कराळे दाम्पत्याला दहा, आठ व सहा वर्षांच्या तीन मुली आहेत. त्यांच्या मागे आई, भाऊ व तीन चिमुकल्या मुली असा परिवार आहे. ऐन तारुण्यात पती-पत्नीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि. १९) तुरोरी येथील व्यापारी महासंघाच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून कराळे दाम्पत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
रात्री आठ वाजता प्रमोद व प्रणिती यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले होते. चितेवर अग्नि संस्कार होताच त्यांच्या तीन चिमुकल्या मुलींनी फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारा होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.