उमरगा: मोटरसायकलने कट का मारला, या क्षुल्लक कारणावरून विचारणा करणाऱ्या तरुणाला तिघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, हंटर आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या भावालाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज लियाकत जमादार (वय २३, रा. जकेकूर) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. १९ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जकेकूर गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. आरोपी रोहन दत्ता पवार, शैलेश दिलीप सुतार आणि अजय जीवन बिराजदार (सर्व रा. जकेकूर) यांनी आपल्या मोटरसायकलने फिर्यादी फिरोज यांना कट मारला.
याबाबत फिरोज यांनी त्यांना जाब विचारला असता, याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, कमरेच्या बेल्टने आणि हंटरने मारहाण करून जखमी केले. हे भांडण सुरू असताना फिरोज यांचा चुलत भाऊ मोईन गफुर हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली आणि ‘तुम्हाला बघून घेतो’ अशी धमकी दिली.
या घटनेनंतर फिरोज जमादार यांनी २० जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहन पवार, शैलेश सुतार आणि अजय बिराजदार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.