वाशी: वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटनांदुरी शिवारात एका भीषण अपघातात 38 वर्षीय विश्वास भिमराव लवटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरती हॉटेल जवळ नैसर्गिक विधीसाठी उभे असताना भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत लवटे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या पत्नी वैशाली लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटरसायकल चालक ज्ञानेश्वर उर्फ भैय्या भागवत गिरी आणि त्याच्यासोबत असलेला विकास उर्फ विकी आनंदराव लिमंकर हे दोघेही आपल्या मोटरसायकलवरून हायगयी आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होते. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला आणि लवटे यांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम 281 (सार्वजनिक मार्गावर अडथळा), 106(1) (इतर कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणे), सह मोवाका कलम 184 (धोकादायक वाहन चालवणे) आणि 65(अ) मदाका (दारूच्या प्रभावाखाली वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विश्वास लवटे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.