वाशी – सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नातेवाईकांच्या सहा मुलांकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार वाशी (जि. धाराशिव) येथे उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुणांना चक्क खोटे नियुक्तीपत्र (जॉइनिंग लेटर) देऊन फसवणूक केली आहे. पैसे परत मागितले असता धमकावल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात मुंबई आणि वाशीतील एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब पंडीतराव सुकाळे (वय ५६ वर्षे, रा. वाशी, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. आरोपी रुईसोद्दीन नबाब हीद काझी (रा. वाशी), संदीप चंद्रकांत चांदीएकर, सनि आणि स्वप्नील मोरे (सर्व रा. मुंबई) यांनी फिर्यादी बाळासाहेब सुकाळे यांना विश्वासात घेतले. ‘तुमच्या नातेवाईकांच्या मुलांना सरकारी नोकरी लावून देतो,’ असे आमिष त्यांनी दाखवले.
या भूलथापांना बळी पडून फिर्यादी आणि साक्षीदारांनी सहा मुलांच्या नोकरीसाठी आरोपींना वेळोवेळी ‘फोन पे’ (PhonePe) आणि बँक खात्याद्वारे एकूण १५,००,००० रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलांना सरकारी नोकरीचे खोटे ‘जॉइनिंग लेटर’ दिले आणि सर्वांचा विश्वासघात केला.
पैसे मागितल्यावर दिली धमकी
नोकरीचे पत्र बनावट असल्याचे आणि नोकरी मिळाली नसल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी सुकाळे यांनी आरोपींकडे आपले पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींनी केवळ ३,१५,००० रुपये परत केले. मात्र, उर्वरित ११,८५,००० रुपये परत देण्याची मागणी केली असता, आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि सुकाळे यांना धमकावले.
पोलिसांत गुन्हा दाखल
आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुकाळे यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुईसोद्दीन काझी, संदीप चांदीएकर, सनि आणि स्वप्नील मोरे या चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१८(४), ३५१(४), आणि ३(५) अन्वये फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.






