वाशी : पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणारी वाहने रस्त्यात ट्रॅक्टर आणि मोटारसायकल लावून अडवत, दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार वाशी तालुक्यातील खानापूर शिवारात उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास गाड्या जाळून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. पी. वर्धमाने सूर्या लि. के. टी. ०७ या पवनचक्की कंपनीचे नांदगाव शिवारातील पवनचक्की सबस्टेशनचे साहित्य घेऊन काही वाहने चालली होती. गुरुवारी (दि. २६ मार्च) दुपारी ३ वाजेच्या सुमारास खानापूर शिवारात, खानापूर पाटी ते खानापूर जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर दगडू लगाडे यांच्या घरासमोर आरोपींनी ही वाहने अडवली.
कंपनीकडून करारनाम्याप्रमाणे रक्कम दिलेली असतानाही, आरोपींनी ट्रॅक्टर व मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून गाड्यांचा रस्ता अडवला. वाहने सोडवण्यासाठी तब्बल २,००,००० रुपयांची (दोन लाख) खंडणी आरोपींनी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास वाहने जाळून टाकीन अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केली.
या घटनेप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी दत्तात्रय शिवाजी माने (वय ४१, मूळ रा. शिरगाव, ता. वाई, जि. सातारा, सध्या रा. मैत्रीपार्क, वाशी, जि. धाराशिव) यांनी शुक्रवारी (दि. २७ मार्च) वाशी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी खालील ८ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(4), 126(2), 352, 351(2)(3), 189, 160, 191(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे:
-
दगडू जुळजीराम लगाडे
-
रणजित दगडू लगाडे
-
धम्मदीप रणजित लगाडे
-
प्रशांत रत्नप्रकाश शिंदे
-
आकाश अच्युत लगाडे
-
किरण वसंत शिंदे
-
अविनाश राजेंद्र लगाडे (सर्व रा. खानापूर, ता. वाशी)
-
निलेश लगाडे (रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव)
सदर घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.





