धाराशिव येथे रविवारी सकाळी एका महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मिना सिध्देश्वर घायाळ (वय ३५) यांना महादेव जालींदर कसबे, जिजाबाई महादेव कसबे आणि योगिता कसबे यांनी तुळजापूर नाक्यावर मारहाण केली. आरोपींनी घायाळ यांना “तूच माझ्या पोराला फाशी दिली” असे म्हणत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घायाळ यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. या वादातूनच ही घटना घडल्याची शक्यता आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
शेतातील वादातून मारहाण, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल
घाटनांदुर ता. भुम येथे शेतातील सोयाबीनच्या बुचाडावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अनंत दत्तात्रय लवटे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमर वसंत लवटे, विलास सुखदेव लवटे, वसंत सोनाजी लवटे, सुखदेव सोनाजी लवटे, छाया विलास लवटे, ताई खंडु लवटे, उषा वसंत लवटे, आरती महावीर लवटे, खंडु सुखदेव लवटे आणि शिलावती सुखदेव लवटे यांनी त्यांच्यावर, त्यांचे वडील नारायण वाघमारे आणि चुलत भाऊ राजेश भागवत वाघमारे यांच्यावर हल्ला केला.
आरोपींनी लवटे यांच्या शेतातील सोयाबीनचे बुचाड चोरून नेल्याचा आरोप करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी कत्ती व काठीने हल्ला केला. या हल्ल्यात लवटे यांना दुखापत झाली आहे. तसेच, आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी लवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.