येरमाळा – माशाचे पैसे मागितल्यावरून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सोनु उर्फ निखील शिवाजी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चोराखळी येथे २९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८:३० ते ३० जानेवारी २०२५ सकाळी ८:३० च्या दरम्यान घडली.
या प्रकरणी सुनील नामदेव शिंदे (वय ५२) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी सोनु शिंदे यांनी त्यांच्या मुला-मुलीला, भाऊ अनिलला माशाचे पैसे मागितल्यावरून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्या व काठीने मारहाण करत जखमी केले.
या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी सोनु उर्फ निखील शिवाजी शिंदे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (भा.दं.वि.) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२),(३), ३५२ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ.जा.ज.अ.प्र.) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्ही.अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.