धाराशिव – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांवर धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बालाजी नगर परिसरातून पोलिसांनी सुमारे ३९,००० रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत पांडुरंग टेळे (वय ३४, रा. बालाजी नगर, धाराशिव) आणि मुजुर तांबोळी (रा. वाघोली, ता. जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बालाजी नगर परिसरात काही इसम प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, आरोपी प्रशांत टेळे आणि मुजुर तांबोळी हे गुटखा विक्री करताना रंगेहाथ सापडले.
त्यांच्याकडून ‘डायरेक्टर पान मसाला’चे ४२ बॉक्स आणि सुगंधी जर्द्याचे १९० पाऊच असा एकूण ३९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. शहरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.