पक्या: आरं भावड्या, पेंद्या… इकडं बघा रं! धाराशिवच्या इलेक्शनची खबर आलीया… च्या गरम हाय एकदम!
भावड्या: काय झालं? लागली का आचारसंहिता? दिवाळीच्या आधीच फटाके फुटायलेत वाटतं?
पक्या: आरं फटाके न्हाय, बॉम्बच फुटलाय बॉम्ब! आपला नगराध्यक्ष हाय ना, त्यो आता बाईमाणसासाठी सुटलाय… आन त्यात पन ओबीसी बाई पाहिजे! अख्ख्या वार्डात पन्नास टक्के बायकाच निवडून येणार… भल्याभल्याची विकेट पडली बघ!
पेंद्या: (चहाचा कप खाली ठेवत, तोंड वाकडं करून) च्यायला! गेलं… माझं नगरसेवक व्हायचं स्वप्न गेलं गटारात! चारदोन पोस्टर बी छापून ठिवले व्हते… आता काय खरं न्हाय आपलं…
भावड्या: (हसत) आरं येड्या, तुझं काय घेऊन बसलाय? इकडं जे बाशिंग बांधून बसले व्हते नगराध्यक्ष व्हायला, त्येंच्या घरात आता शिमगा लागला आसंल! आता सगळे आपल्या कारभारीला पुढे करणार…
पक्या: खरंय तुझं! आपल्या ठाकरे सेनेच्या सोमनाथ आप्पांनी लगीच तयारी सुरू केलीया… त्येंच्या कारभारीनला उभं करणार म्हनं महाविकास आघाडीकडून!
भावड्या: मंग आता आप्पाच्या विरोधात कोण उतरणार? भाजपवाल्यांची काय हवा हाय? त्येंचं ठरलंय का शिंदे सेनेसंगं जायचं का एकटं लढायचं?
पक्या: त्येंचंच तर खरं न्हाय ना! पन त्यो युवराज नळे हाय ना, लय जोर लावतोय आपल्या ‘सौ’ ला तिकीट मिळावं म्हणून … त्याच्यासंगं अक्षय ढोबळे, पिराजी मंजुळे, खंडेराव चौरे… ही सगळी मंडळी राणा दादाच्या मागं लागलीया… बायकोला तिकीट मिळावं म्हणून…
पेंद्या: म्हणजे आता खरं इलेक्शन ह्यांच्यात न्हाय, तर ह्यांच्या बायकांत लागणार! लय मजा यील बघायला… कोण कुणाच्या डोस्क्यात काय भरवतंय आन कोण पडद्यामागून सूत्रं हलवतंय…
(तेवढ्यात पेंद्याची बायको, गंगी, कमरेवर हात ठेवून तिथे येते.)
गंगी: आवं! इकडं पारावर बसून काय येड्यागत गप्पा हानताय? घरी जनावरांना पाणी दावलं का? आन काय चाललंय इलेक्शनचं कुजबुज?
पेंद्या: (घाबरून) काय न्हाय गं गंगे… असंच… नगराध्यक्षपद बाईमाणसाला मिळालंय… म्हणून बोलत व्हतो…
गंगी: (डोळे मोठे करत) मंग? चांगलंच झालं की! आता कळंल ह्यास्नी कारभार कसा करायचा असतोय ते! नुसतं मिशीला पीळ देऊन आन भाषणात आरडून राजकारण होत नसतंय. घरात चार माणसं सांभाळता येत न्हाय, आन चाललेत गाव चालवायला!
भावड्या: (गंगीच्या बोलण्याला दुजोरा देत) खरंय वहिनी… आता कारभारी मागं आन कारभारीनच पुढं दिसणार…
गंगी: (पेंद्याकडे रोखून बघत) आन तुम्ही काय कमी हाय व्हय? तुमचं बी लय मोठ्ठं स्वप्न व्हतं ना… एक काम करा… मलाच उभं करा की इलेक्शनला! मी दावते कसा कारभार करायचा असतोय ते. अख्ख्या गावातले रस्ते इस्त्री केल्यासारखं गुळगुळीत करीन… आन नळाला २४ तास पाणी आणीन… तुमच्यासारखं नुसतं आश्वासनाचं गाजर दाखवणार न्हाय!
पेंद्या: (चेहरा पाडून, काकुळतीला येत) गंगे… तू काय बी बोलू नगं… लोकं हसायलेत बघ… चल घरी चल…
गंगी: कशाला हसायलेत? आता बायाचंच राज्य येणार हाय! चला… उठा… लय झालं राजकारण… घरी कामाचा डोंगर पडलाय! (पेंद्याचा हात धरून जवळजवळ ओढतच घेऊन जाते.)
(पक्या आणि भावड्या खो खो हसायला लागतात.)
पक्या: बघितलंस भावड्या… आता खरं राजकारण घरातून सुरू होणार! पेंद्याची हालत बघ कशी झाली ती…
भावड्या: खरंय… आता “सौ.” च्या नावावर “सरकार” चालणार! लय मजा येणार राव ह्या निवडणुकीत!