परंडा: शहराजवळील रुई शिवारात विहिरीवरील विद्युत पंपाची वायर आणि तांब्याची केबल चोरून नेणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने कोयत्याचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी परंडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
रमजान हजरत मुजावर (वय ३२, रा. कसबे तडवळा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भिमराव चंद्रभान मुळीक (वय ५०, रा. रुई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुई येथील बावची रोडला असलेल्या उमाकांत कापसे यांच्या शेतातील विहिरीवर आरोपीने मोटारीची वायर आणि जळालेल्या मोटारीचे ४ एमएमचे तांबे काढलेली केबल असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जमा केला होता. यावेळी फिर्यादी व इतरांनी त्याला हटकले असता, त्याने कोयत्याचा धाक दाखवून माल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात आले असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्सा खंडेश्वरी येथे दोन घरे फोडली; ७ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास
कळंब: तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दोन घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ७ लाख ३२ हजार ३८५ रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ ते २६ जानेवारी दरम्यान घडली.
याबाबत निशिकांत भागवत पाटील (वय ५७, रा. मस्सा खंडेश्वरी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी निशिकांत पाटील यांच्या घराचे कडी-कोंडा कापून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातून १० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच शेजारील बापूराव बाबुराव इंगोले (वय ६६) यांच्याही घरातून ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरले.
दोन्ही घरांतून मिळून चोरट्यांनी ७ लाखांहून अधिक रकमेची चोरी केली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव: खानापूर शिवारातून स्प्रिंकलरची चोरी
धाराशिव: तालुक्यातील खानापूर शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी स्प्रिंकलरचे १६ नग चोरून नेले. ही घटना २६ ते २७ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी सदाशिव हरिश्चंद्र राठोड (वय ७०, रा. घाटंग्री) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राठोड यांचे खानापूर शिवारात गट नं. ४४ मध्ये शेत आहे. चोरट्यांनी शेतात ठेवलेले अंदाजे १५,००० रुपये किमतीचे १६ स्प्रिंकलर नोझल्स चोरून नेले. पोलिसांनी बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
डीआयसी रोडवरून दुचाकी लंपास
धाराशिव: शहरातील मोरे कॉर्नर येथील ईसाफ बँकेसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही घटना १३ जानेवारी रोजी रात्री घडली होती, ज्याचा गुन्हा आता दाखल झाला आहे.
बालाजी रमेश शिंदे (वय २६, रा. केशेगाव) यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची २०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच २५ वाय ५३९६) ही दुचाकी डीआयसी रोडवर पार्क केली होती. ती चोरीला गेल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







