तुळजापूर : शहरात ठिकठिकाणी तुंबलेल्या नाल्या, पसरलेली दुर्गंधी आणि नळाद्वारे होणारा दूषित पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) तुळजापूर नगर परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या त्वरित मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
तुळजापूर शहरात सध्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. अनेक भागांतील नाल्या तुंबल्या असून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व्हमधून हे सांडपाणी झिरपून नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचत आहे. या दूषित पाण्यामुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
-
पाण्याची लॅब तपासणी: शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलला असून, या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा.
-
कचरा व्यवस्थापन: शहरात नियमित कचरा उचलला जात नसून ठिकठिकाणी ढीग साचले आहेत. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी.
-
स्वच्छता मोहीम: गटारी आणि रस्त्यांची तातडीने साफसफाई करून शहराला दुर्गंधीमुक्त करावे.
“नागरिकांना शुद्ध पाणी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, सध्या नळाला दूषित पाणी येत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— अमोल कुतवळ, नगरसेवक
या आंदोलनात नगरसेवक अमोल कुतवळ, आनंद जगताप, रणजीत इंगळे, अक्षय कदम, प्रगती लोंढे, रवींद्र इंगळे, गणपत कदम, नागनाथ भांजी, बालाजी तट, अफसर शेख, डी. टी. क्षिरसागर, युसूफ शेख, चंद्रकांत कदम यांच्यासह सोमनाथ भोजने, किरण यादव, श्रीकांत खंडागळे, योगेश खोतकरी, अर्जुन साळुंके, विजयकुमार नवले आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





