तुळजापूर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्य सरकारविरोधात जोरदार रणशिंग फुंकले. छत्रपती संभाजीनगर येथील ‘तुमसे ना हो पाएगा’ आंदोलनादरम्यान विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांवर घणाघाती टीका केली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत दानवे यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांचा रोखठोक समाचार घेतला.
दानवे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. यातूनच तुळजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. भाजपच्या या कृतीला ‘नौटंकी’ ठरवत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भाजपच्या या आंदोलनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि आमदार अंबादास दानवे यांच्या निर्भीड भूमिकेचा सन्मान करण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.
भाजपने कितीही आंदोलनांचे नाटक किंवा दडपशाहीचे प्रकार केले, तरी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारला जाब विचारणारा शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासह मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि विकासासाठी शिवसेना यापुढेही रस्त्यावर उतरून आक्रमक लढा देईल, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.





