येरमाळा: ट्रॅक्टरला रस्ता का दिला नाही, या कारणावरून वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर लोखंडी रॉड, दगड आणि काठ्यांनी जीवघेणे हल्ले केले. या थरारक घटनेप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांतील एकूण २५ जणांवर खुनाचा प्रयत्न (भारतीय न्याय संहिता – BNS) आणि दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १९) सायंकाळी घडली.
पहिल्या गटाची फिर्याद: १६ जणांवर गुन्हा या प्रकरणी पहिली फिर्याद नरसिंग प्रभू वाघमारे (वय ५५, रा. खामकरवाडी, ता. वाशी) यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या सुमारास ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता का दिला नाही, या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून वाघमारे यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्या, दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या नातेवाइकांनाही आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले.
-
आरोपींची नावे: या फिर्यादीवरून नाना सर्जेराव कोकाटे, अनिकेत नाना कोकाटे, शशिकांत नाना कोकाटे, सर्जेराव लिंबा कोकाटे, उत्रेश्वर बन्सी कोकाटे, बन्सी सर्जेराव कोकाटे, ओंकार बन्सी कोकाटे, अंबादास बालाजी लुगडे, रंजित पोपट लुगडे, शहाजी हिरबा लुगडे, पंकज पोपट लुगडे, निखील बालाजी लुगडे (सर्व रा. खामकरवाडी), स्वप्नील बप्पा पौळ (रा. तेरखेडा), सुरज रामदास जगदाळे, किरण मोहन इदगे आणि किशोर मोहन इदगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाची फिर्याद: ९ जणांवर गुन्हा या घटनेत दुसरी फिर्याद उत्रेश्वर बन्सी कोकाटे (वय २७, रा. खामकरवाडी) यांनी दिली आहे. तेरखेडा येथील बालाजी आण्णा घोलप यांच्या फटाका कारखान्याजवळ आरोपींनी योगेश वासुदेव लुगडे याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून उत्रेश्वर कोकाटे आणि त्यांच्या नातेवाइकांना शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉड, दगड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
-
आरोपींची नावे: या फिर्यादीवरून नरसिंह प्रभू वाघमारे, अजय नरसिंह वाघमारे, सिध्दु सर्जेराव कोकाटे, सदाशिव येडबा वाघमारे, सागर सोमनाथ कोकाटे, विजय नरसिंह वाघमारे, विष्णू शंकर सावंत, महादेव येडबा वाघमारे आणि सुनीता नरसिंह वाघमारे (सर्व रा. खामकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गटांच्या प्रथम खबरीवरून बुधवारी (ता. २०) येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.






