येरमाळा: येथील प्रसिद्ध श्री येडेश्वरी मंदिर परिसरात भाविकांना लुटण्याचे आणि दमदाटी करण्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी (दि. २) पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या वादातून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कीर्तनकार महाराज आणि त्यांच्या कुटुंबाला ४ ते ५ जणांच्या टोळीने लोखंडी रॉड, बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात भाविक रक्तबंबाळ झाले असून महिलांचे दागिने आणि पैसे ओरबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, मारहाणीनंतर जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आलेल्या भाविकांना पोलिसांनी तब्बल ४ तास ताटकळत ठेवूनही फिर्याद नोंदवून घेतली नाही, असा खळबळजनक आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कडा (ता. आष्टी) येथील कीर्तनकार परमेश्वर केरूळकर महाराज हे आपल्या कुटुंबासह मंगळवारी श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येरमाळा येथे आले होते. येडेश्वरी मंदिर परिसरात गाडी पार्क करत असताना तिथल्या काही स्थानिक ४ ते ५ तरुणांनी त्यांच्याकडे जबरदस्तीने १०० रुपये पार्किंग शुल्काची मागणी केली. यावर महाराजांच्या नातेवाईकांनी “आम्ही पैसे देतो, पण गाडी लावण्यास उशीर का करतोस?” असे विचारले.
या किरकोळ कारणावरून संतापलेल्या ४ ते ५ जणांच्या टोळीने गैरकायद्याची मंडळी जमवून केरूळकर महाराज आणि त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर टोळक्याने हातामध्ये लोखंडी रॉड, बेल्ट, लाठ्या आणि दगड घेऊन संपूर्ण कुटुंबावर हल्ला चढवला.
महिला आणि लहान मुलांनाही मारहाण; दागिने ओरबाडले
हा हल्ला इतका भीषण होता की, गुंडांनी महिला आणि लहान मुलांनाही सोडले नाही. त्यांनाही लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात पुरुष मंडळी गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाली. मारहाणीच्या गोंधळाचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि जवळील रोकड जबरदस्तीने ओरबाडून नेली.
पोलिस ठाण्याच्या परिसरातही दमदाटी; पोलिसांचे डोळे बंद?
“आम्ही जीव वाचवून येरमाळा येथील पोलीस ठाण्यात आलो. उपचारासाठी येथील रुग्णालयात उपचार करून पुन्हा ठाण्यात आलो. आम्ही रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही पोलिसांनी ४ तास आमची फिर्याद नोंदवून घेतली नाही. उलट, पोलीस ठाण्याच्या परिसरातच आरोपींचे लोक येऊन आम्हाला केस न करण्याची धमकी देत होते. पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असताना त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी आम्हाला हताश होऊन आष्टी येथील पोलीस ठाण्याचा रस्ता धरावा लागला.” – पीडित केरूळकर कुटुंबीय
मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेलाच का वाढतो त्रास?
येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येतात. नेमका याच दिवसांचा गैरफायदा घेऊन मंदिर परिसरातील काही टगे भाविकांना पार्किंग आणि इतर कारणांवरून अडवून दमदाटी करतात. पैसे न दिल्यास थेट मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. या त्रासामुळे अनेक भाविक तक्रार न करताच निघून जातात, ज्यामुळे या गुंडांचे मनोधैर्य अधिक वाढले आहे.
मंदिर परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट
येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव याना निलंबित करण्यात आले असले तरी परिसरात जुगार, छुप्या पद्धतीने गावठी व विदेशी दारूची विक्री आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्याला नूतन सपोनि आळा घालणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.
देवस्थान समिती पार्किंगचे पैसे घेत नाही! “श्री येडेश्वरी देवी मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांच्या गाड्यांसाठी कोणतीही पार्किंग फी घेतली जात नाही. देवस्थानच्या नावाखाली काही खाजगी इसम बेकायदेशीरपणे पार्किंगचे पैसे वसूल करत असून तिथे जुगार आणि अवैध धंदे चालत आहेत. देवस्थान समिती लवकरच पार्किंगच्या जागेवर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था कडक करणार आहे.” – समाधान बेदरे , अध्यक्ष, श्री येडेश्वरी देवस्थान समिती





