मुरुम – लोहारा तालुक्यातील अचलेर तांडा येथे विनापरवाना आणि बेकायदेशीर रित्या पिस्टल (गावठी कट्टा) बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका तरुणाला मुरुम पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडन घातक शस्त्र जप्त केले असून मुरुम पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांनी टाकला छापा
मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील अचलेर तांडा येथे एक इसम लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने घातक शस्त्र जवळ बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मुरुम पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास मुरुम पोलिसांच्या विशेष पथकाने अचलेर तांडा परिसरात अचानक छापा टाकला.
अजित पवार पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी संशयावरून अजित सुभाष पवार (रा. अचलेर तांडा, ता. लोहारा, जि. धाराशिव) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे लोकांच्या जीविताला आणि सुरक्षेला धोका निर्माण करेल अशा स्वरूपाचे एक विनापरवाना, बेकायदेशीर पिस्टल पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ ते पिस्टल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निळकंठ कटोरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या प्रथम खबरेवरून आरोपी अजित पवार याच्याविरुद्ध शस्त्र कायदा (Arms Act) कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा विनापरवाना कट्टा आरोपीने कुठून आणला आणि याचा वापर तो कशासाठी करणार होता, याचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.






