धाराशिव | देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या कथित अटकेचा निषेध, शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET पेपरफुटी, विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. 22) तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, जंतर-मंतर येथे पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईमुळे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी आणि NEET पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील कथित लाठीहल्ल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जुलमी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला. संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, शहराध्यक्ष धनंजय राऊत, विनोद वीर, प्रशांत पाटील, शीला उंबरे, अग्निवेश शिंदे, मेहबूब पटेल, जयसिंग पवार, अभिषेक बागल, मिलिंद गोवर्धन, जावेद काझी, हरिदास शिंदे, बाबा मोमीन, पोपट शिंदे, राजेंद्र राऊत, संकेत पडवळ, महावीर चव्हाण, मन्सूर सय्यद, अभिमान पेठे, सद्दाम काझी, मोईब शेख, धनराज जांगिड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.




