धाराशिव | दिल्लीतील जंतरमंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांना बाधा आणणारी बाब असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेबाबत त्यांच्या मनातील प्रश्नांवर शासनाने संवेदनशीलतेने विचार करणे आवश्यक आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे अत्यंत निषेधार्ह आहे.
“विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्या समजून घेऊन सकारात्मक चर्चा व्हावी. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आंदोलन करून आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली.
यावेळी केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने हाताळून रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता कायम ठेवावी आणि भरती प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.





