धाराशिव: धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत पवनचक्कीच्या पॉईंटवरून मौल्यवान साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. अनसुर्डा शिवारातील जंगलातून पाठलाग करून या टोळीतील चार जणांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पवनचक्कीचे कॉपर केबल, कॉपर रॉड, तार आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४,४८,००० रुपये (चार लाख अडचाळीस हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाशी आणि येरमाळा पोलीस ठाण्यांतील चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अनसुर्डा शिवारातील जंगलात एलसीबीचा सापळा
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान अनसुर्डा शिवारातील फॉरेस्टमध्ये (जंगलात) दाट झाडीत पवनचक्कीच्या पॉईंटवरून चोरी करणारी टोळी लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस पथकाने वाहने लांब थांबवून जंगलात पायी चालत जात सापळा रचला. पोलिसांना पाहताच दाट झाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेतले.
नवीन बांधकामाच्या ठिकाणी लपवला होता मुद्देमाल
पकडण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी (अभिलेख) तपासली असता, त्यांच्यावर धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, आरोपी नंदू रामा शिंदे याने खामकरवाडी येथील आपल्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी चोरीचे साहित्य लपवून ठेवल्याची कबुली दिली.
पथकाने तात्काळ खामकरवाडी येथे जाऊन छापा मारला आणि कॉपर केबल वायर, कॉपर रॉड आणि तार हस्तगत केली. तपासात सदर साहित्याबाबत वाशी आणि येरमाळा पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) अनिल नाना काळे (वय ४० वर्षे, रा. मस्सा)
२) नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी)
३) बबलू उर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९ वर्षे, रा. खामकरवाडी)
४) शाम उर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८ वर्षे, रा. खामकरवाडी).
४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून पवनचक्कीचे कॉपर केबल, कॉपर रॉड, तार आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४,४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, पोलीस चालक महेबूब अरब, प्रकाश बोईनवाड आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.





