धाराशिव: वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा गावातील पारधी पिढी येथे मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी धाडसी कारवाई करत ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या २२ जणांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत रोख रकमेसह एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली २५ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा येथे लाखो रुपयांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सदरचे ठिकाण हे पारधी वस्तीतील संवेदनशील आणि आक्रमक वृत्तीच्या लोकवस्तीचे असल्याने तेथे कारवाई करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा, जलद प्रतिसाद पथक (QRT) आणि दंगा काबू पथक (RCP) यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला आणि छापा मारला.
पोलिसांनी घटनास्थळावरून पैशांची पैज लावून जुगार खेळताना २२ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ४६ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, १५ मोबाईल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा अवाढव्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशन येथे जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
या कारवाईचे सर्वात मोठे यश म्हणजे पोलिसांना अनेक गुन्ह्यांमध्ये हवे असलेले दोन सराईत गुन्हेगार यात गवसले आहेत. यातील आरोपी संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा एकूण १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे, तर अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी येथील दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी आहे.
ही संपूर्ण धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील अंमलदारांनी केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.





