धाराशिव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता अंबादास दानवे विरुद्ध खासदार ओमराजे निंबाळकर असा रंगला आहे. दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यातील फोटो एक्सवर पोस्ट करत “कोण होतास तू, आता काय झालास!” अशी खोचक टीका केली होती. या टीकेला ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दानवेंच्या टीकेला उत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी 2029 मध्ये धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. “एकदा जनतेतून निवडणूक लढवा, म्हणजे स्वतःची लायकी कळेल,” अशा शब्दांत त्यांनी दानवेंवर निशाणा साधला. “2029 ला जर जमलं, तर धाराशिवमध्येच येऊन लढा,” असेही निंबाळकर यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.
‘उठायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट करायची’
ओमराजे यांनी सोशल मीडिया पोस्टवरूनही दानवेंना टोला लगावला. “काही लोकांना काहीच काम नाही, उठायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट करायची,” अशी टीका त्यांनी केली. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामान्य जनतेची कामे करण्यात वेळ घालवत असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले.
‘मी जेवढे फोन उचलतो, त्याच्या दहा टक्के तरी उचलून दाखवा’
एवढ्यावरच न थांबता ओमराजेंनी दानवेंना आणखी एक आव्हान दिले. “एक दिवस माझ्यासोबत या आणि मी जेवढे फोन उचलतो, त्याच्या दहा टक्के तुम्ही फोन घेऊन दाखवा,” असे ते म्हणाले. त्यामुळे दानवे-निंबाळकर यांच्यातील राजकीय शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
दानवेंची पोस्ट नेमकी काय होती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातील एका फोटोमध्ये मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत, तर त्यांच्या मागे खासदार ओमराजे निंबाळकर दिसत होते. दानवे यांनी निंबाळकरांच्या भोवती लाल रंगाचे वर्तुळ करत हा फोटो एक्सवर पोस्ट केला आणि “कोण होतास तू, आता काय झालास!” अशी टिप्पणी केली. पोस्टसोबत “#पळालेल्यांची #अवस्था” असा हॅशटॅगही वापरला होता.
यानंतर निंबाळकरांनी पहिल्यांदाच दानवेंवर थेट आणि आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिल्याने धाराशिवच्या राजकारणात या वादाची चर्चा सुरू झाली आहे.






