कळंब: परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसांनी अमली पदार्थ (एमडी ड्रग्ज) तस्करी प्रकरणी मोठी कारवाई केली असून, या कारवाईचे धागेदोरे लातूर, परळीसह थेट धाराशिव जिल्ह्यातील कळंबपर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी कळंब येथील नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा याला अटक करण्यात आली आहे. एका लोकप्रतिनिधीचे नाव थेट आंतरजिल्हा ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये समोर आल्याने कळंब शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कारवाईचा घटनाक्रम आणि आरोपी
मानवत (परभणी) तालुक्यातील रत्नापूर शिवारात २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि मानवत पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत ७३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यावेळी दोघांना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या कसून चौकशीत ड्रग्जच्या व्यवहाराचे धागेदोरे परळी, लातूर आणि कळंबपर्यंत जोडले जात असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आणि ८ ऑगस्ट रोजी रात्री आणखी सहा जणांना बेड्या ठोकल्या. यामुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे.
अटक करण्यात आलेल्या नवीन सहा आरोपींमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
-
मोसिन सलीम मिर्झा (वय ३८, रा. कळंब, जि. धाराशिव)
-
आयान नासेर पठाण (वय २०, रा. बरकत नगर चौक, परळी, जि. बीड)
-
शेख सलमान शेख खयुम (वय २८, रा. जुने रेल्वे स्टेशन, काक्कर मोहल्ला, परळी, जि. बीड)
-
समीर शब्बीर सय्यद (वय ३१, रा. बरकत नगर, परळी, जि. बीड)
-
अक्कीब आक्रमसाब मोमीन (वय ३१, रा. साळे गल्ली, लातूर)
-
बाबा रफिक मोमीन (वय ३४, रा. खांडगाव रोड, ख्वाजा नगर, लातूर)
स्थानिक ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का? तपासाची मागणी
काही दिवसांपूर्वीच कळंब-येरमाळा रोडवरील तलाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने ११.२१ ग्रॅम एमडी जप्त करून दोन संशयितांवर कारवाई केली होती. आता परभणीतील कारवाईत कळंबमधील नगरसेवकाचे नाव आल्याने या दोन्ही प्रकरणांमध्ये काही परस्पर संबंध आहे का, याची स्वतंत्रपणे पडताळणी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित व्यक्तीचे सीडीआर, मोबाईलमधील डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यास ड्रग्ज पुरवठा साखळीचे मोठे धागेदोरे उलगडू शकतात, असे मत नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.
याशिवाय, परभणी पोलिसांकडून अटक करण्यात आलेली व्यक्ती स्थानिक पोलिसांच्या रेकॉर्डवर होती का आणि कळंब पोलिसांना याची पूर्वकल्पना का नव्हती, याबाबत स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




