धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे सध्या ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ असाच सुरू आहे. एकीकडे भ्रष्टाचाराच्या आणि मनमानीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील गुरुजी रस्त्यावर उतरून घाम गाळत आहेत, तर दुसरीकडे झेडपीच्या अध्यक्षा ‘माऊली’ (अर्चना पाटील) मात्र मस्तपैकी ‘परदेश वारी’चा आनंद लुटत आहेत. याच परदेश वारीच्या हट्टापायी आज (मंगळवारी) होणारी बहुचर्चित सर्वसाधारण सभा अचानक रद्द करून प्रशासनाने लोकशाहीची थेट थट्टाच उडवली आहे!
५५ सदस्यांना नोटीस, पण ‘माऊलीं’चा हट्ट भारी!
झेडपीच्या सर्व ५५ सदस्यांना तब्बल सात दिवसांपूर्वीच या सर्वसाधारण सभेची अधिकृत नोटीस देण्यात आली होती. जिल्ह्यातील सध्याचे तापलेले वातावरण आणि शिक्षण विभागातील उघड झालेले घोटाळे पाहता, या सभेत मोठे ‘तुफान’ येणार, हे निश्चित होते.
पण सभा अचानक रद्द का झाली? तर कारण अतिशय ‘गंभीर’ आहे— अध्यक्षा अर्चना पाटील या परदेश दौऱ्यावर गेल्या आहेत आणि त्या अद्याप धाराशिवमध्ये परतलेल्या नाहीत!
खरं तर, लोकशाहीच्या आणि झेडपीच्या नियमानुसार, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष या सभेचे कामकाज पाहू शकतात आणि सभा घेऊ शकतात. उपाध्यक्षांना तो कायदेशीर अधिकार आहे. पण इथे लोकशाही चालते कुठे? इथे तर ‘माऊलीं’ची हुकूमशाही चालते! “मी आले तरच सभा होईल, माझ्याशिवाय पानही हलणार नाही,” या माऊलींच्या अट्टहासामुळे उपाध्यक्षांना डावलून ही महत्त्वाची सभा थेट हवेत विरघळली आहे.
आता १३ तारखेची सभा गाजणार! (विरोधक तरी जागे होणार का?)
आता ही रद्द झालेली सर्वसाधारण सभा म्हणे १३ तारखेला होणार आहे. या १३ तारखेच्या सभेवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे, कारण या सभेत खालील ‘स्फोटक’ मुद्दे गाजणार आहेत:
-
५ ते ७ लाखांचे ‘खोके’ आणि १६ विस्तार अधिकारी ओके!प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून थेट ५ ते ७ लाख रुपये प्रतिव्यक्ती घेऊन तब्बल १६ शिक्षकांना ‘शिक्षण विस्तार अधिकारी’ पदाची पदोन्नती खैरातीसारखी वाटल्याचा गंभीर आरोप ११ शिक्षक संघटनांनी केला आहे. या ‘प्रमोशन घोटाळ्या’वर सभेत नक्कीच आगडोंब उसळणार आहे.
-
कोरोनाचा १ कोटींचा निधी गेला कुठे?कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी जमा केलेला १.१५ कोटींचा कोरोना निधी अद्यापही पडून आहे की तो ‘गायब’ झाला? याचा हिशोब विरोधक मागणार का?
“मी कुठेही खात नाही…” या डायलॉगची होणार कसोटी!
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काही दिवसांपूर्वी माऊलींनी पत्रकारांसमोर अत्यंत आत्मविश्वासाने एक ‘ऐतिहासिक’ विधान केले होते— “मी कुठेही खात नाही, आम्हाला खायला भरपूर जागा आहेत!”
आता झेडपीच्या मोक्याच्या जागेवरील बीओटी (BOT) चा डाव, १४ कोटींचे थकीत भाडे, दीड कोटींच्या नव्या गाड्या आणि ५ ते ७ लाखांचा ‘प्रमोशन घोटाळा’ उघडकीस आल्यावर, विरोधी पक्ष माऊलींच्या ‘त्या’ विधानाचा समाचार घेणार का? की नेहमीप्रमाणे ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ करत अर्थपूर्ण तडजोडी करून सभेचे सूप वाजवणार, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!
सध्या तरी धाराशिवचे प्रशासन ‘व्हिजन २०३०’च्या नावाखाली साहेबांच्या गाड्या, माऊलींची परदेश वारी आणि अधिकाऱ्यांच्या ‘प्रमोशन’च्या मलिद्यावरच पोसले जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे.






